पिंपरी - केंद्र सरकारच्या इंडिया सायकल फोर चेंज चॅलेंज स्पर्धेत महापालिकेला एक कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी सांगवी फाटा ते काळेवाडी फाटा रस्त्यास पसंती दिली आहे.
त्यामुळे या रस्त्यावर सायकल ट्रॅक व पदपथ विकसित केला जाणार आहे. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी महापालिकेमार्फत स्मार्ट सिटीकडे वर्ग केला जाणार आहे. तसेच, सांगवीतील देवकर पार्क ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंतच्या कामासही मंजुरी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक व वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. ३०) झाली. त्यात विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. कंपनीचे चेअरमन तथा अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, संचालक तथा महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, सचिन चिखले, पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, सचिव ममता बात्रा, चित्रा पवार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीटी) राजन पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (पॅन सिटी) निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, सह शहर अभियंता अशोक भालकर आदी उपस्थित होते.
बैठकीतील निर्णय
मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संचालक मंडळाचा अहवाल मंजूर
लेखापरीक्षण समिती स्थापन करणे
नामांकन व मोबदला समितीच्या घटनेस मान्यता
सीएमआर समितीवर इच्छुक संचालकांच्या नियुक्तीबाबत चर्चा
निविदेतील अटी व करारनाम्यानुसार गुणवत्तेबाबत कोणताही बदल न करणे
विविध पदांवर नियुक्त्या
पीएमपी अध्यक्षा लक्ष्मीनारायण मिश्रा यांची स्मार्ट सिटी संचालकपदी नियुक्ती
लेखापरीक्षक एमकेजीएन अँड असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटंट यांची नियुक्ती
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रदीप कुमार भार्गव यांची तज्ज्ञ संचालक
असोसिएशन ऑफ एडोलोसेंट अँड चाईल्ड केअर इन इंडियाचे उपाध्यक्ष यशवंत भावे यांची तज्ज्ञ संचालक
सात सल्लागारांची नेमणूक करणे
खर्चास मान्यता
१.७३ कोटी - स्मार्ट घटकांचा वीजपुरवठा
२० लाख - सायकल फोर चेंज चॅलेंजसाठी टेक्निकल कन्सल्टंट व एनएमटी एक्सपर्ट