शेतकऱ्यांना पाच लाखांचे कर्ज शून्य टक्के दराने :: आत्माराम कलाटे
मुळशी प्रतिनिधी :: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
ही देशातील अग्रगण्य बँक आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाणार आहे. हा निर्णय बॅंकेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. येत्या रब्बी हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज ही घोषणा केली.
कर्ज पुरवठ्याच्या या प्रस्तावाला सहकार विभागाची मान्यता घेऊन अंमलजबावणी करण्यात येणार आहे. पाच लाख रूपये शून्य टक्के व्याजाने देणारी पुणे जिल्हा बँक देशातील एकमेव बँक ठरणार आहे. तीन लाखांहून अधिक आणि पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीन लाखांपुढील रकमेचे म्हणजे उर्वरित दोन लाख रुपयांचे व्याज जिल्हा बॅक भरणार आहे.
बॅंकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पुणे बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक आत्माराम नाना कलाटे हे या सभेला ऑनलाइन उपस्थित होते.
जिल्हा बॅक ही शेतकऱ्यांची बॅक आहे. या बॅंकेचा खरा मालक हा शेतकरी आहे. शून्य टक्के पीक कर्ज वाटपाची मर्यादा वाढवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यांची मागणी पूर्ण करणे हे बॅंकेचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य आज पार पाडले आहे. यामुळे अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, असे बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम कलाटे म्हणाले की भोर मुळशी वेल्हा तालुक्यातल्या जनतेला मी आव्हान करतो की या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम नाना कलाटे यांनी केले आहे.