सोलापूर : सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असताना पुणे विद्यापीठातून 'कमवा व शिका' योजनेतून शिक्षण पूर्ण करत शेतकरीपुत्र ते मीडिया कन्सल्टंट असा प्रवास किशोर रक्ताटे यांनी केला आहे.
ज्या पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ते स्वत: 'पॅरासिट'म्हणून राहिले, त्याच वसतिगृहाचे रेक्टर म्हणून काम पाहिले. अवघ्या सव्वादोन वर्षात होस्टेलचे उत्पन्नही वाढवून दाखवले. संघर्षमय जगण्याकडे नेहमी सकारात्मकतेने पाहिल्याने जगणे सहज झाल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे पती किशोर रक्ताटे यांनी सांगितले.
'सकाळ'च्या कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी ते बोलत होते. 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी श्री. रक्ताटे यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाच्या वाट्याला येणारेच जीवन त्यांच्याही वाट्याला आले. मात्र, ते जगण्यातला संघर्ष वगैरे न मानता त्याकडे सकारात्मकेतून पाहतात. पत्रकारितेतील पदवीनंतर त्यांनी अगदी काही दिवसच दैनिकात काम केले. नंतर त्यांनी नियोजन आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांचे स्वीय सहाय्यक म्हणून दिल्ली येथे काम पाहिले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी विवाहबद्ध झाल्यांनतर ते दिल्लीची नोकरी सोडून परतले.
Also Read: बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार : रामदास आठवले
ज्या पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पॅरासिटर म्हणून राहिले. त्याच वसतिगृहाचे रेक्टर म्हणून काम पाहिले. अवघ्या काही दिवसांच्या कारकिर्दीत त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. वसतिगृहाच्या उत्पादनात वाढ करून दाखवली. नगर येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अॅकॅडमी सुरू केली. पुढे अॅकॅडमीचा कार्यभार एका मित्राकडे सोपवत मीडिया कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम सुरू केले. आज ते प्रत्येक निवडणुकीत किमान एक हजार ते दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. विविध सर्व्हेपासून राजकीय विश्लेषक म्हणून भूमिका निभावतात. यशस्वी मीडिया कन्सल्टंट म्हणून काम सुरू असतानाही यापुढेही त्यांचा नाविन्याचा शोध सुरूच आहे. स्वत:चा एक व्याख्यानाचा विषय निवडून त्यावर व्याख्यान देणे सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या अनुभवाच्या शिदोरीचा सर्वांना उपयोग करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
घरावर पत्नीचे नाव प्रथम
सर्वसामान्यपणे घरावरील नावाच्या पाटीवर पतीचे नाव वर व पत्नीचे खाली असते किंवा दोघांचे समोरासमोर लिहिले जाते. मात्र, किशोर रक्ताटे यांच्या पत्नी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे नाव प्रथम व स्वत:चे खाली लिहिले आहे. तेजस्वी सातपुते यांना सर्वत्र ओळखले जाते. त्यांच्या पदाचे वलय त्यांच्या नावाला आहे. यामुळे त्यांना ओळखणारे लोक जास्त आहेत, हा व्यवहारिक विचार करून त्यांनी घरावरील नामफलकावर देखील पहिले नाव पत्नीचे व त्यानंतर स्वत:चे टाकले आहे.