पुणे प्रतिनिधी ::
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रतील दलित, बहुजन समाजाच्या त्यात विशेषतः मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. हे राज्य कायद्याचे आहे की गुंडांचे, बाहुबलींचे आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. आता या प्रस्थापित बाहुबलींची मजल समाजातील डॉक्टर, वकील, शिक्षक, नोकरदार, छोटे मोठे व्यावसायिक तसेच सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्ये पर्यत पोहोचली आहे. त्यामुळे सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झालेले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथिल गरीब कुटुंबातून आपल्या गुणवत्तेच्या व कष्टाच्या जोरावर मेरीट मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारे डॉ. हनमंत धर्मकारे हे आपल्या नम्र, कष्टाळू तसेच वैद्यकीय ज्ञानाच्या बळावर अल्पावधीतच उमरखेड तसेच यवतमाळ जिल्ह्यात एक प्रथितयश बालरोगतज्ञ म्हणून सुप्रसिद्ध झाले. गोरगरीबांच्या आजारी बालकांना मोफत सेवा देणारे डॉ हनमंत धर्मकारे हे गरीबांचे तारणहार झाले. परंतु त्यांचे हे यश प्रस्थापित बाहुबलींना खुपले, म्हणूनच त्यांनी डॉ धर्मकारे यांची गोळ्या घालून निघृण हत्या केली.
डॉ हनमंत धर्मकारे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना व मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करण्यासाठी तसेच या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करुन आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सीआयडीकडे तपास सोपवण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.