पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सासवड रस्त्यावर फुरसुंगी येथील पावर हाऊस जवळ एका भरधाव कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत कारचालक तरूणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली आहे.
अक्षय बाळासाहेब चिव्हे (वय ३१, रा. संयोग कॉलनी, फुरसुंगी) असे अपघाती मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत बाळासाहेब महादेव चिवे (वय ५९, रा. संयोग कॉनली, काळेपडळ) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे
माहितीनुसार, अक्षय यांची काळेपडळ परिसरात मोबाईल शॉपी आहे. ते आणि त्यांचे वडील बाळासाहेब चिव्हे दुकानाचे काम पाहतात. मंगळवारी अक्षय हे काहीतरी कामानिमित्त कार घेऊन गेले होते. यावेळी हडपसरकडून फुरसुंगी येथील त्यांच्या घरी पहाटे अडीचच्या सुमारास जात होते. यावेळी फुरसुंगी येथील पावर हाऊस अपेक्षा लॉन्स समोरच्या रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम काळेपडळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.