कोण होते गुलझारी लाल नंदा आणि एकदा नाही तर दोनवेळा त्यांच्याकडे काळजीवाहू पंतप्रधानपद कसं आलं? हे आपण पाहू.
1920 मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. कोणत्याही प्रकारे इंग्रजांना सहकार्य करायचं नाही. जर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या तर एका वर्षात स्वराज्य मिळेल, असं गांधीजींनी म्हटलं होतं. त्यांच्या म्हणण्यावरुन अनेकांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या होत्या.
गुलझारीलाल नंदा यांचे चरित्र 'गुलझारीलाल नंदा - अ लाइफ इन द सर्व्हिस ऑफ पीपल'मध्ये गांधीजी आणि नंदा यांच्या भेटीचे वर्णन आहे. नंदा यांनी आपल्या डायरीत या गोष्टींची नोंद करुन ठेवली होती. असं या पुस्तकाच्या लेखिका प्रोमिला कानन यांनी म्हटलं आहे.
गांधीजींच्या असहकार आंदोलनात उतरण्यापूर्वी मनात खूप घालमेल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1916 ला त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक बाळ देखील होतं. तेव्हा या सर्वांची जबाबदारी कोण उचलणार हे देखील मनात होतं.
"गांधीजींसोबत जाण्यासाठी मला माझी नोकरी सोडावी लागणार होती. घर चालवण्यासाठी महिन्याला 40 रुपये मला आवश्यक होते. त्यामुळे हे कसं करावं याविषयी माझ्या मनात खल सुरू होता. त्यांना भेटल्यानंतर मी अस्वस्थ होतो आणि मनात विचारांचे काहूर माजलं होतं. पण शेवटी मी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला," अशी नोंद नंदा यांच्या चरित्रात आहे.
शंकरलाल बांकेर नावाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली.
नंदा सांगतात की मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरील मणी भवन येथे महात्मा गांधी यांची भेट झाली. त्यांच्या हातात एक मोठं पात्र होतं त्यातून ते नाश्ता करत होते. आजूबाजूला काही नेते मंडळी आणि पत्रांचा ढीग पडलेला होता. त्यानंतर गांधींजी यांनी माझी विचारपूस केली आणि मी काय करू शकतो याचा अंदाज घेतला.
कामगार प्रश्नांविषयी जिव्हाळा
1920-21मध्ये त्यांनी गांधींजीनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात उडी घेतली. तेव्हापासून गांधींजींनी दिलेल्या मार्गावरच ते आयुष्यभर चालले.
गुलझारीलाल नंदा यांना मजूर आणि कामगार प्रश्नांबद्दल सहानुभूती सुरुवातीपासूनच होती. त्यांच्या अभ्यासाचा विषयच मजूर चळवळ हा होता.
पण त्यांचं ज्ञान केवळ पुस्तकीच राहिलं नाही तर ज्या गोष्टी त्यांनी पुस्तकातून शिकल्या त्या प्रत्यक्ष जीवनात कशा लागू होतील याविषयी ते सजग होते.
यातूनच त्यांनी टेक्सटाइल कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी 'मजूर महाजन' या युनियनची सुरुवात केली.
काँग्रेसच्या ट्रेड युनियनच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीतून त्यांनी आपले विचार मांडले होते. यातूनच ते 1947 साली जिनिव्हा येथे झालेल्या श्रम परिषदेत ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.
गुलझारीलाल नंदांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून का निवड झाली?
27 मे 1964 रोजी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर 9 जूनपर्यंत नंदा यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी वाहिली. त्यानंतर लालबहादुर शास्त्री देशाचे पंतप्रधान राहिले.
नेहरूंच्या मंत्रिमंडळात काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांची निवड ते ज्येष्ठ असल्यामुळे झाली असं म्हटलं जातं. पण तसं असतं तर मंत्रिमंडळात त्यांच्याहून दोन वर्षं मोठे असलेले मोरारजी देसाई हे काळजीवाहू पंतप्रधान व्हायला हवे होते.
पण काँग्रेस कमिटीने मोरारजींच्या ऐवजी नंदा यांना पसंती दिली. नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत मोरारजी देसाई स्वतः होते त्यामुळे शर्यतीत नसलेला परंतु ज्येष्ठ असा चेहरा म्हणून नंदा यांच्याकडे पाहिलं जात असावं. त्यातून त्यांना हे पद मिळालं असल्याचं म्हटलं जातं.
या 13 दिवसांच्या कार्यकाळात देशात कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणं हेच महत्त्वाचं काम होतं ते त्यांनी चोखपणे बजावलं आणि नंतर काँग्रेस कमिटीने ठरवल्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा शास्त्रींच्या हाती दिली. शास्त्रींनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि ते गृहमंत्री बनले.
11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूरशास्त्री यांचं ताश्कंदमध्ये निधन झालं आणि त्याच दिवशी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी पडली.
यावेळी इंदिरा गांधी, के. कामराज, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, एम. सी. छागला हे दिग्गज नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. गुलझारीलाल नंदा मात्र हे कधीच त्या शर्यतीत नव्हते म्हणून पुन्हा त्यांच्या गळ्यात ही माळ पडली आणि पुन्हा 13 दिवसांनी त्यांनी हे पद इंदिरा गांधी यांच्याकडे सुपूर्द केलं.
त्यांना सत्तेचा मोह नव्हता यामुळेच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं लेखिका श्रुती जोशी यांनी द प्रिंटसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
गुलझारीलाल नंदा यांच्यानंतर पुन्हा देशाचं काळजीवाहू पंतप्रधानपद देण्यात आलं. यावेळी इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान बनल्या. पुन्हा गुलझारीलाल नंदा हे गृहमंत्री बनले.
साधू-संतांच्या मोर्चामुळे गेलं गृहमंत्रिपद
1966 मध्ये गुलझारीलाल नंदा हे देशाचे गृहमंत्री होते. त्यावेळी गोहत्या प्रतिबंध कायद्यावरुन हिंदू समुदायाच्या भावना तीव्र होत्या. गोहत्या प्रतिबंध कायदा यावा यासाठी सतत आंदोलनं होत असत.
1966 मध्ये या कायद्यासाठी साधू संतांनी दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी साधू-संत आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत सरकारी स्थळांची आणि मालमत्तेची नासधूस केली. त्यानंतर त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता.