वाल्मीक कराड जेलमध्ये मात्र जिल्ह्यात गॅंग ऍक्टिव्ह; रॉड-कोयत्याने मारहाण, दोन आरोपी कर्नाटकमधून ताब्यात
Beed Crime (livemaharashtra.co.in)
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींना कर्नाटक येथून धारूरकडे घेऊन पोलिसांचं पथक रवाना झालं आहे.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून अशोक मोहिते याला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यात अशोक मोहिते गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाल्मीक कराड जेलमध्ये मात्र जिल्ह्यात दहशत कायम
ताब्यात घेतलेले आरोपी आंधळेचे मित्र?
अशोक मोहितेला मारहाण केल्यानंतर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. या दोघांनाही काल रात्री उशिरा पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले. हे दोघेही फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अशोक मोहिते हे अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. ते धारुरच्या पोलीस स्टेशनमध्ये होमगार्डमध्ये नोकरीला करतात.