पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल, करुणा शर्मांचा खुलाशाने राजकारणात खळबळ!
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्यांना करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना पोटगी द्यावी लागणार आहे.
करुणा शर्मा यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडेंचं नाही, तर पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाऊ शकतं. माझ्या नवऱ्याला त्रास दिला, मी 27 वर्ष पत्नी आहे, पण तरीही माझ्याविरोधात कट रचला जातोय. त्या पुढे म्हणाल्या, मी काहीही न बोलता सहन केलं, पण आता गरज पडल्यास मी कॅबिनेटमध्ये येऊन बोलेन. तुम्ही मला रोडवर सोडू शकत नाही, मी तुमची पत्नी आहे.
करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, वाल्मिक कराडने माझ्यावर हल्ला केला, पण माझ्या तक्रारीनंतरही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवाहन करत सांगितले, जर महिलांबद्दल सहानुभूती असेल, तर धनंजय मुंडेंना पक्षातून हाकललं पाहिजे.करुणा शर्मा यांनी महिला आयोगावरही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी वारंवार महिला आयोगाकडे गेली, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही. मी दिल्लीत रेखा शर्मा यांना सांगितले होते की, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पदावरून हटवावे, कारण त्यांनी योग्य निर्णय घेतले नाहीत. करुणा शर्मा यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. आता पाहावे लागेल की धनंजय मुंडे आणि भाजप-राष्ट्रवादी यावर काय प्रतिक्रिया देतात.