पिंपरी -चिंचवड

संघर्षयोद्धा’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शरद लाटे 11   17-02-2025 09:41:20

Pune (Pcmctahalka.in) :: खासदार श्रीरंग बारणे यांचा नगरसेवक ते महासंसदरत्न खासदार हा संघर्ष पाहिला तर त्यांना दिलेली संघर्षयोद्धा ही उपाधी समर्पक आहे. समाजसेवेत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘संघर्षयोद्धा’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. ही जीवनगाथा असून खडतर प्रवास त्यात आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचावे. मी खासदार बारणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. खासदार बारणे यांनी लोकांचा विश्वास कमविला आहे. त्यांना जनता कधी अंतर देणार नाही. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असेही शिंदे म्हणाले. श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त ‘संघर्षयोद्धा’ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विजय शिवतारे, सुनील शेळके, महेंद्र थोरवे, राहुल कुल, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, नाना काटे, प्रशांत शितोळे,  प्रमोद कुटे, निलेश बारणे, शत्रुघ्न काटे, सदाशिव खाडे, शीतल शिंदे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, जयश्री गावडे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे उपस्थित होते. 

एकनाथ शिंदे म्हणाले, मावळरत्न खासदार श्रीरंग बारणे यांनी जनसेवा, समाजसेवेचा यज्ञ मांडला आहे. त्यांची कारकीर्द संघर्षाची आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि थेट खासदार झाले. बहुमत नसताना स्थायी समिती अध्यक्ष झाले. जमिनीवरचा कार्यकर्ता खासदार झाला. त्यांना जनतेचे प्रश्न, त्यांच्या अडचणींची जाणीव असते. लोकभावनेची ते कदर करतात. खासदार बारणे लेखकही असून पाच पुस्तक लिहिली आहेत. मतदारसंघातील जनतेची कामे करतात. त्यांनी माझ्याकडे वैयक्तिक कामे कधी आणली नाहीत. ते कार्यकर्ता जपतात, त्यांना बळ देतात. कार्यकर्ते कुटुंबाची पर्वा न करता काम करतात. अशा कार्यकर्त्यांमुळे महायुतीला मोठे यश मिळाले. हे काम खासदार बारणे अचूकपणे काम करतात. त्यांचा अंदाज अचूक असतो. त्यांना दांडगा विश्वास होता. फेक नरेटिव्ह लोकसभेला असतानाही खासदार बारणे यांचा विश्वास आणि अंदाज खरा ठरला. नगरसेवक ते महासंसदरत्न हा संघर्ष पहिला तर त्यांना दिलेली संघर्षयोद्धा ही उपाधी समर्पक आहे. समाजसेवेत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘संघर्षयोद्धा’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. सर्वांनी हे पुस्तक वाचावे. ही जीवनगाथा आहे. खडतर प्रवास त्यात आहे. मी खासदार बारणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. सर्वांना काही पाहिजे हे पाहणारा खासदार बारणे आहेत. त्यांनी मावळवर भगवा फडकवित ठेवला. मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे तीनदा निवडून आले. त्यांनी भल्याभल्याना अस्मान दाखविले. जनता त्यांच्या पाठीशी आहे. संसदरत्न, महासंसदरत्न, विशेष संसदरत्न असे आठ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. 

राजकारण हे समाज सेवेचे माध्यम आहे. लोकांसाठी राजकारण, समाजकारण करत असून खुर्चीसाठी करत नाही. पदे, येतात जातात, वर-खाली होतात. मुख्यमंत्री कधीच स्वतःला समजलो नाही. कॉमन मॅन होतो. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सर्वात वरची आहे. सरकारने सुरू केलेल्या एकही योजना बंद केली जाणार नाही. सत्तेला लाथ मारून आम्ही सर्वांनी उठाव केला. 40 आमदार माझ्यासोबत आले. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे 500 वर्षाचे स्वप्न, 370 कलम रद्द करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण केले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. मला पुरस्कार मिळाल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे. अडीच वर्षे झाले तरी पोटदुखी थांबत नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.