पुणे (Pune Dipak Mankar)
माजी आमदार रविंद्र धंगेकरांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर महायुतीमधील नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोथरुड येथील एका जाहीर कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहरातील एका नेत्याने देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यामुळे धंगेकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे महायुतीमध्ये मीठाचा खड्डा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आपल्याला वाटत होतं का? अजित पवार आणि भाजप एकत्रित येतील. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकतं. अजितदादांना तर त्यांनी जेलच्या दारात नेऊन बसवलं होतं. अजित पवारांविरोधात ट्रकभर कागदपत्रं आहेत, असेही सांगितले जात होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन अर्थ खातंही देण्यात आलं आहे, त्यामुळे राजकारणात असं काही नसतं, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. या टीकेचा समाचार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी घेतला आहे.
अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही, असा कडक शब्दांतील थेट इशाराच मानकर यांनी धंगेकर यांना दिला आहे.