मुंबई (Mumbai)
सातबारा, नकाशे, एनए जमीन दाखवून डोंबिवलीतील आयरे गावात इमारत उभारणाऱ्या बिल्डरांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याबाबत आवाज उठवताच खडबडून जाग आलेल्या तहसीलदारांनी रामनगर पोलिसांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिले.त्यानंतर आज बांधकाम व्यावसायिक शालीक भगत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे कल्याण, डोंबिवलीत 65 इमारती उभारून सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या भूमाफियांना पहिला दणका बसला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बोगस महारेरा नोंदणी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारलेल्या 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या फसवणुकीमुळे सुमारे साडेसहा हजार कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. याप्रकरणी संबंधित बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे केली होती. त्यांनी केलेल्या चौकशीदरम्यान डोंबिवलीतील आयरे गावात बनावट सातबारा उतारा तयार करताना तो भोगवटा वर्ग 2 वरून वर्ग 1 मध्ये बदलण्यात आल्याचे आढळले. या प्रकरणात तहसीलदारांनी रामनगर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी शालीक भगत यांच्याविरोधात आज गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.