पुणे

दुप्पट टोल भरावा लागणार, महाराष्ट्र सरकाराचा मोठा निर्णय

नितीन देशपांडे 62   17-03-2025 10:57:50

मुंबई- तुमच्या कारला फास्ट टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. फास्ट टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली आहे. त्यानंतर आता १ एप्रिलपासून राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

 

फास्ट टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोख रक्कम द्यावी लागणार आहे. हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निश्चित केलेल्या धोरणांशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

प्रवाशांना फास्ट टॅग बंधनकारक

 

मुंबईतील पाच टोलनाके एमएसआरडीसीकडे आहेत. यात मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली, दहिसर आणि वाशी या पाच टोल नाक्यांवर स्कूल बसेस, हलकी मोटार वाहने आणि राज्य परिवहन बस यांना कोणताही टोल आकारला जात नाही. तर, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, सोलापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, नागपूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, छत्रपती संभाजी नगर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, काटोल बायपास आणि चिमूर-वरोर-वणी महामार्गचं व्यवस्थापनही एमएसआरडीसीकडे आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फास्ट टॅग बंधनकारक असेल. अन्यथा वाहनधारकांना दुप्पट पैसे द्यावे लागतील.

 

कोणत्याही वाहनांना टोल माफी नाही

 

मुंबईत हलक्या वाहनांना, शाळेच्या बसला टोलमाफी आहे. त्यानुसार मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही टोल नाक्यांवर या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असून तेथे फास्ट टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, एमएमआरमध्ये प्रवास करणाऱ्या वाहनांपैकी अनेक वाहनांना फास्ट टॅग नसण्याची शक्यता आहे. पण यापुढे त्यांनाही फास्ट टॅग प्रणालीशी खाते जोडावे लागेल. कारण वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि अटल सेतूवर टोल वसुली करण्यात येते. तेथे कोणत्याही वाहनांना टोल माफी नाही. त्यामुळे तेथे प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य आहे



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.