पुणे-:
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली होती, चौकशी अहवालातून देखील रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे, त्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला.
नेमकं काय आहे प्रकरण?
असा आरोप होत आहे की, प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये रुग्णालयात जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. कुटुंबीयांनी सुरुवातीला अडीच लाख रुपये भरण्याची तयारी देखील दाखवली, मात्र या महिलेला दाखल करून घेण्यात आलं नाही, वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला, त्यानंतर राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं. रुग्णालयाच्या विरोधात कारवाईच्या मागणीनं जोर धरला. ईश्वरी भीसे असं या प्रकरणातील मृत महिलेचं नाव आहे.
दरम्यान या प्रकरणात राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल देखील समोर आला आहे. या अहवालात देखील रुग्णालयावरच महिलेच्या मृत्यूचा ठपका ठेवण्यात आला आहे. आणखी दोन समितींचा अहवाल अद्याप बाकी आहे, हा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाणार असून, हॉस्पिटल प्रशासनावर गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला.