पुणे (Pune)
डांबर खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराकडून डांबराची खरेदी करण्याची निविदा रद्द करून आता कंपन्यांकडून डांबराची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याचा अहवाल पुढील काही दिवसांत सादर होईल, असे भोसले यांनी सांगितले.
डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी महापालिका ठेकेदारामार्फत डांबराची खरेदी करीत होती. त्यामुळे महापालिकेचे प्रतिटन चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत होते. महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप माजी सभागृह नेते नीलेश निकम यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
याबाबतची काही कागदपत्रे निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे दिली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त भोसले यांना महापालिका ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करीत असल्याबाबत विचारले असता ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात आली आहे. यापुढील काळात थेट कंपनीकडून डांबराची खरेदी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.