पिंपरी-चिंचवड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह आज पिंपरी-चिंचवड शहरात ओसंडून वाहत होता. भारतीय जनता पार्टीने या दिनानिमित्त शहरात १४ मंडलनिहाय एकूण ३१ ठिकाणी भव्य योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला हजारो योग साधक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक परिसरातील शिव छत्रपती लिनियर अर्बन गार्डन येथे झालेल्या योग शिबिराला विशेष प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पार्टी, रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभाग, संघ परिवार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपचे सत्यजित भैया यांनी संगीताच्या तालावर उपस्थितांकडून विविध योगासने आणि प्राणायाम करून घेतले. त्यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे याबद्दल सविस्तर माहिती देत, नागरिकांना योगाभ्यासाविषयी जागरूक केले.
प्रसंगी, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, "आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग आपल्याला केवळ शारीरिक तंदुरुस्तीच देत नाही, तर तो मानसिक शांती आणि एकाग्रताही प्रदान करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर नेऊन संपूर्ण मानवजातीला एक अनमोल भेट दिली आहे."
काटे पुढे म्हणाले की, "योग हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. नियमित योगाभ्यासाने ताणतणाव कमी होतो, प्रतिकारशक्ती वाढते आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. यामुळे व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर समाजासाठीही अधिक कार्यक्षम बनते. योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहे, असेही ते म्हणाले.