पुणे

‘महाराष्ट्र केसरी’ ते ‘ऑलिम्पिक विजेता’ – नवा संकल्प, नवी दिशा!

नितीन देशपांडे 11   22-06-2025 20:09:01

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धे'चे उदघाटन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र सर्व खेळात पुढे जात असून गेल्या 3 वर्षांत राज्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, खेलो इंडियामध्ये सर्वाधिक पदके पटकावली आहेत. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या सर्वांचीच मान उंचावली आहे. कुस्तीमध्येदेखील महाराष्ट्राच्या 15 वर्षांखालील खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी केली, तसेच वरिष्ठ खेळाडूदेखील चांगली कामगिरी करत आहेत. पण, वरिष्ठ किंवा युवा खेळाडूंना जागतिक स्तरावर पदके अथवा रेकग्निशन मिळत नाही, या विषयाकडे रामदास तडस व संपूर्ण टीमने लक्ष द्यावे. राज्य सरकारकडून आपल्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी, आहारासाठी, फिजिओसाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ. आता आपण खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राने कु्स्तीचे पदक पटकावण्यासाठी निश्चितपणे काम केले पाहिजे.

आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रचंड ग्लॅमर प्राप्त झाले आहे. पण, आपल्या खेळाडूंना महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर जगातील सर्व काही जिंकले, आता पुढे काहीही जिंकायची आवश्यकता नाही, असे वाटते. आता मात्र हा विचार बदलला पाहिजे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या पहिलवानाला ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठीचे प्रशिक्षण द्यावे लागेल.

आपल्या देशात कुस्तीची प्राचीन परंपरा असून रामायण, महाभारतातील सर्वच महानायक चांगले कु्स्तीगीर होते. पण, आता कुस्ती लाल मातीतून मॅटवर आली आहे. त्यामुळे कुस्ती क्षेत्रातील आपला प्रभाव थोडा कमी झाला. तरीही आपले खेळाडू तयार होत असून त्यांना योग्य वातावरण उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यासाठी राज्यातील मोठ्या संस्था, फाऊंडेशन, कॉर्पोरेट्स यांच्यासोबत कुस्तीला जोडून व्यावसायिकता व थोडा ग्लॅमर आणू. सोबतच आधुनिक प्रकारे प्रशिक्षण, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक-आवश्यकता असेल तर परकीय प्रशिक्षकदेखील आणू. जेणेकरुन जागतिक स्तरावर आपल्या कुस्तीला नवा आयाम देऊ शकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील छोट्यातल्या छोट्या गावात कुस्ती व कबड्डी खेळणारे खेळाडू मिळतात. पुणे व कोल्हापूरच्या तालमींपासून नागपूर व अमरावतीच्या आखाड्यात कुस्ती खेळणारे खेळाडू सापडतात. कुस्ती भारतीय खेळ असल्याने आता भारताचे आणि महाराष्ट्राचेदेखील अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात आपण ते निश्चितच करुन दाखवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोणत्याही खेळामध्ये जय-पराजय नाही तर खेळातील सहभाग महत्त्वाचा असतो. कारण खेळामुळे आयुष्यात आलेल्या परिवर्तनाने संघर्ष करण्याची भावना मात्र निर्माण होते. खेळाडू पराजयाने घाबरत नाही तर शिकतो, प्रयत्न करतो आणि जिंकतो. खेळाडू होण्याची इच्छा असलेली व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करते. म्हणून खेळाचे महत्त्व समजून खेळत राहा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना दिल्या. तसेच, 'मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धे'चे आयोजन केल्याबद्दल नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अभिनंदन केले.

यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. संदीप जोशी, आ. कृपाल तुमाने व इतर मान्यवर उपस्थित होते.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.